मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गॅस तुटवड्याने नागरिक पुन्हा एकदा रांगेत उभे ठाकले आहे. नोटाबंदीची आठवण नागरिकांना झाली आहे. भर उन्हात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत आहेत. आतापर्यंत घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे गॅस बुकिंगचे नंबर बंद येत असल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीवर गदारोळ होत आहे. तर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तीन-चार तास रांगेत उभे राहुनही गॅस सिलेंडर मिळेल याची शाश्वती नसल्याने सर्वसामान्यांचा पारा उन्हापेक्षा अधिक वाढला आहे. संतापाचा कडेलोट होण्यापूर्वची उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये एलपीजी सिलिंडर उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आणि काळजी पाहायला मिळतेय. अमेरिका, इस्रायल आणि इराण या तीनही देशांपैकी कुणीही मागे हटायला तयार नसल्यानं युद्ध थांबण्याची चिन्हं नाहीत. या युद्धात मध्य-पूर्वेतील आखाती देशांवरही हल्ले होत आहे आणि भारत इंधनासाठी या देशांवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. त्यामुळे इंधन टंचाईची भीती व्यक्त होतेय. देशाकडे पुरेसं इंधन उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे, मात्र अनेक भागात सिलिंडरसाठी रांगा दिसत आहेत. अनेकांनी चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. संसदेच्या अधिवेशनात याच विषयावरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या अधिवेशनात गॅस टंचाईचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले, काँग्रेस नेत्याची टीका
या सरकारच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे जनतेचे हाल त्यांना दिसत नाहीत. गॅस टंचाई, इंधन तुटवड्यामुळे जनता हैराण झाली आहे. सरकारने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेत. एपस्टीन फाईल्समध्ये हरदीप सिंग पुरी यांचे नाव आले आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्य सरकार ठरवणार कोणाला मिळणार कमर्शियल गॅस सिलिंडर
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत भारतीयांना दिलासा दिला आहे. ङ्गङ्घदेशात कच्च्या तेलाचा भरपूर साठा असून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची टंचाई नाही,ङ्घङ्घ अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे.
घरात रॉकेल, हॉटेलात वापरा कोळसा; सरकार म्हणते देशात गॅसटंचाई नाही
दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम खात्याने घरगुती वापरासाठी केरोसिन आणि हॉटेल-रेस्टॉरंटसाठी कोळशाचा तात्पुरता वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यांना नियमित 1 लाख किलो लिटर कोट्याव्यतिरिक्त अधिक 48,000 किलोलिटर केरोसिन घरगुती स्वयंपाकासाठी उपलब्ध करून दिले आहे. तसेच हॉटेल व खाद्य व्यवसायासाठी बायोमास, आरडीएफ पेलेट्स आणि कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा एक महिन्यासाठी वापर करण्याची परवानगी दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी हे निर्णय जाहीर केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल व्यवसाय अडचणीत
छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस तुटवड्याचा परिणाम आता थेट हॉटेल व्यवसायावर दिसू लागलाय. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे शहरातील अनेक छोट्या-मोठ्या हॉटेलचे शटर डाऊन झाले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी कामगारांना बसून राहण्याची वेळ आली असून अनेक डोसा सेंटर मागील दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. हॉटेल चालकांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी गॅसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून सरकारकडे करण्यात येत आहे.
शहरात गॅस बुकिंगसाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ॲप बंद पडल्यामुळे नागरिकांना थेट गॅस एजन्सीवर जाऊन बुकिंग आणि पावती घ्यावी लागत आहे. त्यामुळे एपीआय कॉर्नर परिसरातील भारत व्यंकटेश गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरपर्यंत रांग लागल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.